विश्वप्रार्थना हे जीवनविद्या तत्त्वज्ञानाचे सार आहे. ती एक सुंदर आणि प्रभावी लहानशी काव्यरचना आहे. विश्वप्रार्थना म्हणणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात पर्यायाने कुटुंबात, समाजात, राष्ट्रात आणि संपूर्ण विश्वात शुभ विचारांच्या लहरींचे प्रक्षेपण होते. विश्वप्रार्थनेमुळे मानवतेची तीन मुलभूत मूल्ये लक्षात येतात - आपण सर्व एकमेकांवर अवलंबून आहोत, एकमेकांशी जोडलेले आहोत आणि परस्परसंबंधित आहोत.
सर्व जाती, धर्म, वर्ण, पंथातील तसेच सर्व वयोगटातील सर्व व्यक्तींसाठी ही प्रार्थना सारखीच उपयुक्त आहे म्हणून ती वैश्विक आहे. संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी विश्वप्रार्थना निर्माण केली आहे.
विश्वप्रार्थनेतील प्रत्येक शब्द वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारीत, तर्कसंगत आणि व्यावहारिकदृष्ट्या जीवनाला अत्यंत उपयुक्त आहे. विश्वातील प्रत्येक माणसाला सुखी करण्याचे सामर्थ्य असणारा हा कल्याणकारी पवित्र मंत्र आहे. विश्वप्रार्थनेतील सकारात्मक विचार संपूर्ण जगात पोहोचून त्या विचारांच्या प्रभावाने हे जग सुखी व्हावे हे विश्वप्रार्थना निर्मितीचे प्रयोजन आहे.
विश्वप्रार्थनेचे सार:
आपले दैनंदिन जीवन अनेक लोकांच्या सहकार्याने, योगदानाने चालते. प्रार्थनेमुळे तुम्हाला या परस्परावलंबनाची जाणीव होते व त्यामुळे सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीबद्दल, व्यक्तीबद्दल त्यांचे भले व्हावे, असे मनापासून वाटू लागते.
विश्वप्रार्थना म्हटल्याने माणुसकीच्या नात्याने आपण एकमेकांशी जोडले जातो. आपले विचार आणि भावना यांचा आपल्याकडून होणार्या कर्मावर परिणाम होत असतो. आपल्या क्रिया आणि त्या क्रियांना मिळणाऱ्या प्रतिक्रिया यांचा परस्परसंबंध असतो. आपल्या मनातील विचार आणि भावना प्रत्यक्ष आकार घेतात. विश्वप्रार्थना म्हणजेच शुभ विचार त्यामुळे त्याला मिळणाऱ्या प्रतिक्रिया या शुभ म्हणजे सकारात्मकच असतात.
शेवटी आपण सर्वजण एकमेकांशी जोडलेले असल्याने या सकारात्मक प्रतिक्रियांची एक साखळी निर्माण होऊन विश्वप्रार्थनेतील शुभ विचारांचे तरंग व्यक्तीकडून कुटुंब, समाज, राष्ट्र आणि विश्वात वाहत जातात. विश्वात सकारात्मक आनंद लहरी निर्माण होतात.
माणसाला सुखी समाधानी जीवन लाभावे म्हणून आवश्यक असणारे आरोग्य, ऐश्वर्य आणि चांगली बुद्धी अर्थात शहाणपण तसेच आत्मिक उन्नती या सर्व गोष्टी विश्वप्रार्थनेत समाविष्ट आहेत. म्हणूनच चार ओळींची ही विश्वप्रार्थना सर्वसमावेशक आहे.
विश्वप्रार्थनेच्या माध्यमातून आपण विश्वात्मक देवाकडे सर्वांसाठी चांगले आरोग्य, समृद्धी, सुख आणि शांती मागतो. सर्वांना आनंदी जीवन प्राप्त होऊ दे, सर्वांची भरभराट होऊ दे अशी इच्छा व्यक्त करतो.
विश्वप्रार्थनेच्या प्रत्येक ओळीतील 'सर्वांना' हा शब्द महत्वाचा आहे. जेव्हा तुम्ही सर्वांच्या भल्यासाठी जाणीवपूर्वक प्रार्थना करता तेव्हा तुमचे विचार व्यापक होतात. ही विश्वप्रार्थना पुन्हा पुन्हा म्हटल्याने त्याची सवय होऊन ती तुमच्या स्वभावात उतरून तुम्हाला जीवनात खूप सुंदर अनुभव येऊ लागतात
प्रार्थना म्हटल्याने 'सर्वांमुळे मी आहे' हा दृष्टिकोन विकसित होतो. जगाशी एकरुप झाल्यामुळे स्वतःच्या पलीकडे जाऊन आपण सर्वांच्या भल्याचा विचार करु लागतो.
अनादी काळापासून माणसाला त्याच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी भगवंताचे नामस्मरण करण्यास सांगितले जाते. परंतु सामान्य प्रापंचिक माणसाला नामस्मरणाची साधना करणे खूप कठीण किंवा जवळजवळ अशक्यच आहे. विश्वप्रार्थना सातत्याने म्हटल्याने आपल्या समस्या सुटतात आणि त्याचे सुपरिणाम आपण अनुभवू शकतो. या प्रार्थनेतील शब्दांचे अर्थ सहज लक्षात येतात. त्यामुळे त्यासोबत आपल्या भावना आणि कल्पना जोडल्या जाऊन त्याप्रमाणे कल्पनाचित्र आपण डोळ्यासमोर आणू शकतो. विश्वप्रार्थना कोणतेही गुतांगुतीचे किंवा समजण्यास अवघड असे तत्वज्ञान सांगत नाही. विश्वप्रार्थनेमुळे माणुसकीची भावना जागृत होते.
विश्वप्रार्थना म्हणता म्हणता प्रार्थनेतील 'सर्वांना' या शब्दाची कक्षा आपण हळूहळू व्यापक करु शकतो आणि माणसाच्या पलीकडे असलेले प्राणी, पक्षी, झाडे आणि पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश अशा गोष्टींचा देखील त्यात समावेश करू शकतो. जेव्हा आपल्याला विश्वप्रार्थना दररोज म्हणण्याची सवय लागते तेव्हा आपल्या आजूबाजूचे हे घटक सुद्धा आपल्यासोबत सुसंवाद साधू लागतात.
हा कोणताही चमत्कार नसून त्यामागे शुद्ध वैज्ञानिक तत्त्व आहे. क्रिया तशी प्रतिक्रिया हा भौतिकशास्त्राचा साधा नियम आहे. जेव्हा आपण मनापासून प्रार्थना म्हणतो तेव्हा वातावरणात सकारात्मक विचारांची स्पंदने प्रक्षेपित होतात आणि निसर्गनियमानुसार वातावरणातील त्याच प्रकारची स्पंदने आपल्याकडे आकर्षित होतात.
विश्वप्रार्थना अत्यंत सुटसुटीत आहे हे तिचे वैशिष्ट्य आहे.
ती कोणीही, कधीही, कुठेही, कोणत्याही भाषेत बोलू शकतो. ती धर्मातीत असल्याने सर्वजण तिचा स्वीकार करू शकतात.
तुम्ही सद्गुरुंकडून अनुग्रह घेतला नसेल तरीही तुम्ही विश्वप्रार्थना म्हणू शकता.
अपेक्षित परिणामांसाठी रात्री झोपण्यापूर्वी १०८ वेळा प्रार्थना म्हणा, कारण त्यावेळी आपले अंतर्मन अत्यंत ग्रहणक्षम असते.
त्याचप्रमाणे विश्वप्रार्थना सामुहिक पद्धतीने आणि सद्गुरुंनी दिलेल्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर म्हटली तर अधिक परिणामकारक होते
प्रार्थना मनापासून म्हणण्यासाठी प्रथम तिचे महत्त्व आणि सार समजून घ्या. जेव्हा ती हृदयातून येते तेव्हा तिच्यातून दिव्य उर्जेचे उत्सर्जन होते.
चिंती परा ते येई घरा' किंवा 'जे पेराल तेच उगवेल'' या उक्तींप्रमाणे विश्वप्रार्थनेमुळे आपण आपल्याकडे सकारात्मक उर्जा आकर्षित करतो.
आपल्या सभोवतालच्या सर्व व्यक्ती आणि वस्तूंचे आपल्या जीवनातील महत्त्व समजल्यामुळे मनात सर्वांविषयी नम्रता आणि कृतज्ञता निर्माण होते.
आपल्या मनात निर्माण झालेले कृतज्ञतेचे तरंग आपल्या सभोवतच्या जगावर उमटतात आणि आपल्यातील सहिष्णुता वृद्धिंगत होऊन एका अभूतपूर्व शांततेची अनुभूती येते.
विश्वप्रार्थनेतील सकारात्मक विचार तुमच्या मानसिक आणि शारिरिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम करतात.