वेबिनार २

‘प्रल्हाद पै स्पीक्स’ या वेबिनारचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री व सांस्कृतिक मंत्री माननीय श्री.विनोद तावडे साहेब यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘सध्या सुरू असलेल्या प्रचंड जीवघेण्या स्पर्धेत स्वतचे करीअर करता करता जीवनाचा आनंद कसा मिळवायचा, हे सांगणारं जीवनविद्येचे तत्वज्ञान आहे’, अशी प्रतिक्रिया माननीय तावडे साहेब यांनी व्यक्त केली. सध्याच्या युगात तरुणांना करीअर, कुटुंब, आरोग्य, सामाजिक जबाबदारी यांचा समतोल साधता येत नाही. या अनुषंगाने तरुणाईला योग्य मार्गदर्शन करत राष्ट्रप्रगती साधणे, हे या वेबिनारचे उद्दीष्ट आहे.

तरुणांच्या दृष्टीने सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे “करीअर”. योग्य करीअर कसे निवडायचे, करीअर कसे करावे, याचे मार्गदर्शन श्री.प्रल्हाद पै यांनी वेबिनारच्या माध्यमातून केले आहे. कोणत्याही क्षेत्रात आपण करीअर करून सर्वोच्च यश प्राप्त करू शकतो. त्यासाठी करीअरची निवड योग्य प्रकारे करणे आवश्यक आहे; अन्यथा जीवनात पश्चाताप करण्याची वेळ येते. यासाठी आपली आवड कोणती, हे शोधणे आवश्यक आहे. कित्येकांना स्वत:ची आवड, क्षमता कशात आहे, याची जाणीव नसते. करीअर म्हटले की प्रत्येकाला पैसा, घर, भरपूर पगार हवा असतो; मात्र नेमकं करीअर कशात करावं, आपली आवड काय आहे याबद्दल ते साशंक असतात. अनेकदा आई, वडील, भाऊ-बहीण अथवा मित्रमैत्रिणी सांगतात म्हणून एखाद्या क्षेत्राची निवड केली जाते. परंतु स्वत:ची आवड, क्षमता ओळखून शहाणपणाने स्वत:च्या करीअरची निवड करावी असे श्री.प्रल्हाद पै सांगतात.

एखाद्या क्षेत्रात करीअर करत असताना आपण अयोग्य क्षेत्र निवडल्याची जाणीव होते अशावेळी योग्य निर्णय घेऊन आपण क्षेत्र बदलू शकतो. अनेकजण स्वत:चा कल ओळखून वेळीच क्षेत्र बदलूनही यशस्वी होतात. यावेळी डॉ.श्रीराम लागू यांचे उदाहरण श्री.प्रल्हाद पै सांगतात. यशस्वी होण्यासाठी तीव्र इच्छाशक्ती असणेही अत्यंत आवश्यक आहे. त्यासोबतच आवड व क्षमतेची सांगड घालता आली पाहिजे. यशस्वी होणे, म्हणजे फक्त पैसे कमावणे नव्हे तर आपल्या करीअरमधून सर्वांना आनंद देता आला पाहिजे, हे सचिन तेंडुलकर व ऑप्रा विलफ्रे यांचे उदाहरण देऊन श्री.प्रल्हाद पै स्पष्ट करतात.

करीअर मध्ये यशस्वी होण्यासाठी लहान लहान उद्दीष्ट (goals) टप्या टप्याने साध्य करणे आवश्यक आहे. ही लहान उद्दीष्ट कशी ठरवावीत व ती साध्य कशी करावीत हे जाणून घेऊया या वेबिनारच्या माध्यमातून – How to set Goals!!!

WordPress Lightbox Plugin