पैशाचा हव्यास

विज्ञानाने प्रचंड प्रगती साधलेली आहे. त्यामुळे अखिल मानवजात अक्षरशः थक्क व दिपून गेली आहे. विविध प्रकारच्या सुखसोयी व ऐषआरामाची साधने माणसाला विज्ञानाने उपलब्ध करून दिलेली आहेत. या सर्व सुखसोयींचे प्रदर्शन सिनेमा, टी. व्ही. स्टार टी. व्ही. या माध्यमातून सर्वत्र केले जाते. या सर्व सुखसोयींचे रसभरीत वर्णन पुस्तकांतून केले जाते. काही विशिष्ट प्रसंगी उदाहरणार्थ, लग्न समारंभ किंवा भव्य प्रमाणात आयोजित केलेले कार्यक्रम या माध्यमातून विलासी जीवनाचे प्रदर्शन करण्यात येते. यांत भरीत भर म्हणजे फाइव्ह स्टार सारखी हॉटेल्स-संस्कृती ही होत. या सर्व गोष्टींमुळे चंगळवाद फोफावला. मौजमजा करणे व चैन चंगळ करणे एवढेच माणसाचे ध्येय होऊन बसले. हा चंगळवाद प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी मुबलक प्रमाणात पैसा उपलब्ध हवा, हे ओघानेच आले. असा हा मुबलक पैसा सरळ मार्गाने मिळत नसतो हे सत्य शेंबड्या पोरालाही कळत असते. याचा परिणाम असा होतो की, वाटेल त्या भल्या बुऱ्या मार्गांनी पैसा मिळविण्यास माणसे प्रवृत्त होतात. भ्रष्टाचार, काळा बाजार, दहशतवाद, दारोडेखोरी, चोऱ्यामाऱ्या, स्मगलिंग वगैरे सर्व अनिष्ट मार्गांनी माणसे अमाप पैसा मिळविण्याचा प्रयत्न करतात. या सर्व अनिष्ट गोष्टींच्या उलाढालीत माणसांना विविध प्रकारच्या अरिष्टांना सामोरे जावे लागते. खून, अपघात, आत्महत्या, शारीरिक व मानसिक रोग, चिंता, काळजी, दुःख, भ्रमिष्टपणा वगैरे सर्व अरिष्टें या माणसांच्या समोर दत्त म्हणून उभी राहतात. अनिष्ट मार्गांनी संपादन केलेला पैसा कोणालाच लाभत नाही. गडगंज पैसा व संपत्ती संपादन करण्याच्या मस्तीत त्यांचे शरीराकडे व कुटुंबाकडे दुर्लक्ष होते. शिवाय अनिष्ट मार्गांनी पैसा मिळविण्यात माणसांना कमालीचे टेंशन येते. शरीराकडे दुर्लक्ष केल्यामुळे व टेंशनमुळे या माणसांना अनेक आधी-व्याधी जडतात व ते मनःशांती हरवून बसतात. संपादित केलेल्या गडगंज संपत्तीचा त्यांना उपभोग सुद्धां घेता येत नाही, इतकेच नव्हे तर या लोकांना अकाली मृत्यू प्राप्त होतो. त्याचप्रमाणे संपादित केलेली गडगंज संपत्ती व पैसा त्यांच्या मुलाबाळांच्या बुध्दिला गंज चढविते, गांजा, गर्द, चरस व अफू अशा अनिष्ट व्यसनांच्या आहारी नेते व सरते शेवटी त्यांना रसातळाला नेऊन पोहोचविते. त्याचप्रमाणे भ्रष्ट व अनिष्ट मार्गाने मिळविलेला पैसा देशाच्या अर्थ व्यवस्थेला तडे देतो व त्यामुळे समाजाची व राष्ट्राची फार मोठ्या प्रमाणावर हानी होते. अशा रीतीने भ्रष्ट व अनिष्ट मार्गाने मिळविलेला शापीत पैसा, तो मिळविणाऱ्यांना, त्यांच्या कुटुंबांना, समाजाला व राष्ट्राला, कोणालाच लाभत नाही, उलट तापदायक मात्र ठरतो. थोडक्यात, अनिष्ट मार्गांनी गडगंज संपत्ती संपादन करणारी माणसे सात पिढ्यांची तरतूद करण्याचा प्रयत्न करतात, पण प्रत्यक्षात मात्र ही माणसे सात पिढ्यांची तरतूद करण्याऐवजी सात पिढ्यांच्या मढ्यांची मात्र तरतूद करीत असतात.

थोर तत्वज्ञ सद्गुरु श्री वामनराव पै
निर्मित जीवनविद्या तत्वज्ञानावर आधारित ब्लॉग्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *