समाज प्रबोधन (Pawas) | २४ फेब्रुवारी ‘१८ | स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन, सद्गुरू चरण उपासीता

‘संत येती घरा! तोचि दिवाळी दसरा !!’

ज्ञानदान व वैचारिक क्रांतीद्वारे समाजसुधारणेचा वसा घेतलेले थोर तत्वज्ञ, सद्गुरू श्री वामनराव पै प्रणित जीवनविद्या मिशन व स्वामी स्वरुपानंद सेवा मंडळ पावस, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २४ फेब्रुवारी २०१८ रोजी भव्य समाजप्रबोधनाचे आयोजन करण्यात आले. जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त व सद्गुरू श्री वामनराव पै यांचे सुपुत्र आदरणीय श्री प्रल्हाद वामनराव पै यांनी रत्नागिरी, पावस येथील स्वामी स्वरुपानंद मंदिरात भाविकांना ‘स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन ! सद्गुरू चरण उपसिता!!’ या विषयावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या आरंभी सद्गुरूचे शिष्य श्री. ठिकसेन बांदकर व त्यांच्या सहकार्‍यांनी सद्गुरू श्री वामनराव पै प्रणित उपासना यज्ञ व संगीत जीवनविद्या सादर केली. या नामजल्लोषाने स्वामी स्वरुपानंद मंदिरातील सर्व भक्तगण मंत्रमुग्ध झाले. स्वामी स्वरुपानंद सेवा मंडळाचे विश्वस्त श्री जयंत देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ‘संत येती घरा ! तोचि दिवाळी दसरा !!’ असे उद्गार काढत आदरणीय श्री प्रल्हाद पै यांचे पावसमध्ये स्वागत केले. तसेच हा कार्यक्रम सर्वांसाठी आनंददायी व प्रेरणादायी असून दरवर्षी श्री. प्रल्हाद पै यांच्या प्रवचनाचा योग येऊन पावस मधील समस्त रहिवाशांना मार्गदर्शनाचा लाभ व्हावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

स्वामी स्वरुपानंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष श्री विजय देसाई व विश्वस्त श्री जयंत देसाई यांनी श्री प्रल्हाद पै यांचा शाल, श्रीफळ व अभंग ज्ञानेश्वरी देऊन सत्कार केला. परमहंस स्वामी स्वरुपानंद व सद्गुरू श्री वामनराव पै यांचे ऋणानुबंध आंग्रेवाडीशी असून हे दोन्ही संत नाथसंप्रदायातील आहेत. आदींनाथांपासून ते संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी नाथसंप्रदायाच्या माध्यमातून जनतेला ज्ञानदान केले. नाथसंप्रदायाची ही परंपरा स्वामी स्वरूपानंद व पुढे सद्गुरू श्री वामनराव पै यांनी सुरू ठेवली. या थोर संतांच्या समाजकार्याला व स्मृतींना कृतज्ञतेने वंदन करून श्री प्रल्हाद पै यांनी प्रबोधनाला सुरुवात केली.

स्वस्वरूपाची जाणीव ठेवून जीवन जगणे महत्वाचे आहे. परमार्थ म्हणजे केवळ भजन करणे नसून तो आपल्या जीवनाचा पाया आहे. परमार्थाचे वर्म व मर्म जाणून घेवून स्वरुपाच्या ठिकाणी असलेला आनंद मिळविला पाहिजे. व हा आनंद मिळविण्यासाठी सद्गुरूंशिवाय तरणोपाय नाही, असे ठाम प्रतिपादन श्री प्रल्हाद पै यांनी केले. सद्गुरूंचे महत्व स्पष्ट करताना त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींचा दृष्टान्त दिला. जीवन कृतार्थ होण्यासाठी सद्गुरूंच्या चरणांची उपासना करणे आवश्यक आहे. हे चरण म्हणजे सद्गुरूंनी दिलेली दिव्य बोध व दिव्य साधना. येथे चरण धरणे म्हणजे सद्गुरूंची सेवा करणे , जिथे दास्यभाव अभिप्रेत आहे. व सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानाप्रमाणे आचरण करणे अपेक्षित आहे. सद्गुरूंनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आचरण केल्यावरच सुखाचे दर्शन होते. आज आपण सर्वजण स्वरुपाच्या ठिकाणी झोपलेलो आहोत. अहंकारामुळे आपला ‘मी’ पणा वेळोवेळी बाहेर डोकावत राहतो. मात्र हा ‘मी’पणा जावून गोविंद म्हणजेच स्वानंदाच्या ठिकाणी आपण स्थिर होणे महत्वाचे आहे. अनेकदा आपण मठात मन शांत करण्यासाठी जातो; मात्र तेथून मत्त, उन्मत्त होवून येतो. तसे न करता आपण मठात जाणे म्हणजे स्वरुपाच्या ठिकाणी ठाम राहणे हे होय.

स्वरूपानंदाचा आस्वाद घेण्याचा सोपा सुलभ मार्ग म्हणजे हा आनंद सर्वांना वाटणे. शुभ चिंतन करणे, शुभ बोलणे, शुभ इच्छा करणे, शुभ करणे याद्वारे सर्वांना आनंद दिल्यास तो सह्स्त्रपटीने बूमरॅग होवून परत येतो, सर्वांबद्दल कृतज्ञ राहून व विश्वप्रार्थना म्हणून आनंद वाटता येतो, असा संदेश श्री प्रल्हाद पै यांनी श्रोत्यांना दिला.

सदर कार्यक्रमासाठी नामधारकांनी सर्व विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली पावस व शेजारील गावात प्रचार प्रसाराचे कार्य केले. या कार्यक्रमाला जीवनविद्या मिशनच्या खेड, चिपळूण, रत्नागिरी, लांजा, वेंगुर्ला, कणकवली, कुडाळ शाखेचे पदाधिकारी, नामधारक तसेच देवरुख, संगमेश्वर, राजापूर येथून मोठ्या संख्येने नामधारक उपस्थित होते. पावस व पावसजवळील पंचक्रोशीतून आलेल्या ग्रामस्थांनीही या कार्यक्रमाचा आनंद लुटला. सद्गुरू श्री वामनराव पै प्रणित जीवनविद्या मिशनचा स्वरुपानंद स्वामींच्या मंदिरातील हा प्रबोधनाचा कार्यक्रम म्हणजे जणू या दोन थोर संतांची गळाभेटच!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *